आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र,
भारत देशाचे महान राष्ट्र...!
राष्ट्रपतींकडून महाराष्ट्राचा मराठीतून गौरव....
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.११ मुंबई: गेल्या साडेचार वर्षात मी १२ वेळा महाराष्ट्रात आलो आहे. महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध राहिला आहे, असं सांगतानाच महाराष्ट्राचा अर्थ सांगायचा झाला तर भाषा विज्ञानाकडे जायची गरज नाही. तुमचे हृदयच महाराष्ट्राचा अर्थ सांगेल. आमचा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. अर्थातत भारताचं महान राज्य आणि क्षेत्र, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राचा गौरव केला. महाराष्ट्राचा गौरव करताना महाराष्ट्राचा नेमका अर्थ काय हे त्यांनी मराठीतून (marathi) सांगितलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज मुंबईत आहेत. त्यांच्या हस्ते आज राजभवनातील दरबार हॉलचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती बोलत होते.
राजभवनातील दरबार हॉलचे लोकार्पण केल्यानंतर ते संबोधित करत होते. त्यांनी आपल्या भाषणात मराठीतून महाराष्ट्राचा अर्थ सांगितला. महाराष्ट्राच्या महानतेचे अधिक आयाम आहेत. त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. महाराष्ट्रातील केवळ महापुरुषांची नावे घेतली तरी यादी कमी पडेल. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेशवर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हेडगेवार आदी अनेक महापुरुष महाराष्ट्राने दिले. विचारधारा वेगळी असेल पण मानवजाताची उत्कर्ष करणे हाच सर्वांचा उद्देश राहिला आहे. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, अन्यायाविरोधात लढणाऱ्या वीरांची धरती आहे. देशभक्त आणि भगवत भक्तांची आहे. महाराष्ट्र हे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. अजिंठा ऐलोरा लेण्या आपल्याला समृद्ध करतात. महाराष्ट्रात प्रतिभा आणि निसर्गाचा विलोभनीय संगम आहे. इथलं आदरतिथ्य प्रसिद्ध आहे, अशा शब्दात रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राची महती विशद केली.
यावेळी राष्ट्रपतींनी गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचंही स्मरण केलं. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यावर मला थोडी सुन्नता जाणवतेय. आठवड्याभरापूर्वी आपण लतादीदींना गमावलं. त्यांचं संगीत अजरामर आहे. त्यांचं संगीत आणि स्वभाव कायम स्मरणात राहील. मला त्यांचा स्नेह लाभला. त्यांचं जाणं दुर्देवी आहे, असं राष्ट्रपती म्हणाले.
लोकांच्या आकांक्षेचं प्रतिक
दरबार हॉलच्या हेरिटेज इमारतीचं वैशिष्ट्ये कायम ठेवून ही इमारती बांधली गेली. आधुनिकतेचा अंगीकार करून ही नवी वास्तू बांधण्यात आली. राष्ट्रपती भवनाप्रमाणेच हे राजभवन सामान्यांच्या आकांक्षाचं प्रतिक झालं आहे. याचं वर्तमान आणि भविष्य महाराष्ट्राच्या गौरवाचं प्रतिक राहिलं आहे. अडीच वर्षापूर्वी मला राजभवनाच्या अंडरग्राऊंड म्युझियमचं उद्घाटन करता आलं. राजभवन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील लोकांच्या आकांक्षेचं प्रतिक आहे, असं ते म्हणाले.
हे राजभवन भारताचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण पाहतो. राजभवन हे लोककल्याणचं केंद्र ठरेल. दरबार हा शब्द राजेशाहीशी संबंधित आहे. मात्र आज दरबार या शब्दाचा संबंध लोकशाही निगडीत झाला आहे. दरबारच्या व्यवस्थेत व्यक्तिगत आणि गोपनीय चर्चा होत नाही. जे काही होतं ते सर्व पारदर्शक होतं. जनतेच्या हिताचं होतं. नव्या संदर्भाने नवा दरबार हाल नवा भारत, नव्या महाराष्ट्राच्या जीवंत लोकशाहीचं प्रतिक आहे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या वैयक्तिक आयुष्यात राजभवनाचा महत्त्वाचा रोल राहिला आहे. मोरारजी देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचा शपथविधा याच राजभवनात पार पडला. त्यावेळी मी त्यांचा खासगी सचिव होतो. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, असं ते म्हणाले.
उद्या राष्ट्रपती रत्नागिरीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोळी जाणार आहे. आंबडवे हे बाबासाहेबांचे आजोळ आहे. तिथे जाऊन बाबासाहेबांच्या स्मारकावर पुष्प अर्पण करणार आहे. दोन महिन्यापूर्वी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पुष्प अर्पण केलं होतं. 350 वर्षापूर्वी याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी देशप्रेमाची ज्योती प्रज्वलित केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
stay connected