कर्तव्यावर असताना तरुण पोलिस सुदाम राजू पोकळे यांचा अपघाती मृत्यू चिंचाळा गावावर शोककळा

 कर्तव्यावर असताना तरुण पोलिस सुदाम राजू पोकळे यांचा अपघाती मृत्यू
चिंचाळा गावावर शोककळा



आष्टी प्रतिनिधी


आष्टी तालुक्यातील चिंचाळा गावचे सुपुत्र, तरुण पोलिस कर्मचारी सुदाम राजकुमार पोकळे यांचे कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी अपघातात निधन झाले. गुरुवारी रात्री अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन चौकी परिसरात गस्त घालत असताना एका भरधाव वाहनाने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला.


सुदाम पोकळे हे शेतकरी कुटुंबातील असून कुटुंबाचा मुख्य आधार होते. त्यांच्या अकाली जाण्याने पोकळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचाळा गाव शोकसागरात बुडाले आहे.


कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, मनमिळावू व सर्वांशी आपुलकीने वागणारा तरुण म्हणून सुदाम पोकळे यांची ओळख होती. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणाऱ्या या शूर पोलिस कर्मचाऱ्याने कर्तव्यावर असतानाच आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चिंचाळा गावासह आष्टी तालुक्यात शोककळा पसरली. अनेक नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.


सुदाम पोकळे हे यापूर्वी अंभोरा पोलीस स्टेशन येथे अनेक वर्षे कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची कर्जत पोलीस स्टेशन येथे बदली झाली होती. नव्या ठिकाणी कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.


त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता चिंचाळा येथील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या वतीने हवेत गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली.  अंत्यसंस्काराला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, पत्नी व मुलगी असा मोठा परिवार आहे. कर्तव्यावर असताना प्राण गमावलेल्या सुदाम पोकळे यांना पोलीस खात्यासह संपूर्ण परिसरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.


ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे असह्य दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.