एका ज्ञानदीपाचा 31 वर्षांचा अखंड प्रवास- हेमंत पोखरण ---------------- प्रकाश सरडे सरांच्या सेवानिवृत्तीला 'कृतज्ञ नमन'

 एका ज्ञानदीपाचा 31 वर्षांचा अखंड प्रवास- हेमंत पोखरणा 
----------------
प्रकाश सरडे सरांच्या सेवानिवृत्तीला 'कृतज्ञ नमन'



----------------

 राजेंद्र जैन / कडा

----------------

अमोलक जैन शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ व आदर्श शिक्षक प्रकाश सरडे यांचा निरोप समारंभ म्हणजे एका सुवर्णकाळाला स्पर्श करण्याचा भावनिक क्षण ठरला. त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे वर्णन करणे म्हणजे जणू सूर्याच्या तेजाला शब्दांची मर्यादा घालण्याचा प्रयत्न केल्यासारखे. 31 वर्षे अखंड, निःस्वार्थ आणि निष्ठेने ज्ञानदान करणारे सरडे सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर संस्थेच्या संस्कारसंपन्न प्रवासातील एक भक्कम आधारस्तंभ होते. विद्यार्थी–प्रिय, साधेपणाचे प्रतीक आणि कर्तव्यनिष्ठा हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलंकार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा यांनी केले.


कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात आयोजित या भावस्पर्शी कार्यक्रमास कार्याध्यक्ष कांतीलाल चानोडिया, गोकुळदास मेहर, बाबूलाल भंडारी, संदीप खाकाळ, डॉ. महेंद्र पटवा, अनिल मुथा, प्राचार्य जवाहरलाल भंडारी, मुख्याध्यापक मथाजी शिकारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीने श्रेष्ठत्व लाभले.



पुढे बोलताना पोखरणा म्हणाले की, “शाळेला कुटुंब मानणाऱ्या या गुरूंनी संस्थेची वाटचाल प्रकाशमान केली. निवृत्ती ही केवळ पदाची, हृदयातील स्थानाची नव्हे. सरडे सरांचे मार्गदर्शन आणि मूल्यांची शिदोरी भावी पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल.” शताब्दीपूर्तीचा अभिमान लाभलेल्या अमोलक जैन संस्थेचे वैभव घडविण्यात शिक्षकांचे योगदान दीपस्तंभावरिल ज्योतीसारखे असल्याचेही त्यांनी सांगितले.


समारंभात संस्थेच्या वतीने सरडे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. “या संस्थेने दिलेले प्रेम माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय ठेवा आहे,” अशा भावनांनी सरडे सरांनी उपस्थितांना भारावून टाकले. प्रास्ताविक मुख्याध्यापक शिकारे यांनी, सूत्रसंचालन बाळासाहेब चव्हाण यांनी तर आभार कृष्णा जाधव यांनी मानले. पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----%%---------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.