विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचा तिसरा दिवस
पोलिसांना शांतता बैठकीचा पडला विसर ?
--------------------
राजेंद्र जैन / कडा
-----------------
गणेशोत्सव साजरा करताना उच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदा सुव्यवस्थेचे, नियमांचे पालन करून हा उत्सव शांततेत, खेळीमेळीच्या वातावरणात सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा याकरिता पोलीस प्रशासनाकडून प्रमुख मंडळ कार्यकर्त्यांची शांतता बैठक घेण्याची परंपरा खंडित झाली काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे . गणरायाच्या आगमनाचा आज तिसरा दिवस उजाडला तरी पोलिसांना शांतता बैठक घेण्याची आठवण झालेली नाही.
सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात यावा , गोंगाट करणारे वाद्य वाजवू नयेत यासाठी उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व नियम, अटींचे गणेश भक्तांकडून पालन व्हावे. सार्वजनिक उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला दोन-चार दिवस अगोदर त्या- त्या पोलिस ठाण्यांतर्गत गणेशोत्सवाच्या आधी गावांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची शांतता बैठक घेण्याची परंपरा आहे. मागील वर्षीपर्यंत ही परंपरा जपली देखील गेली . परंतु यंदा विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होऊन आज तिसरा दिवस उजाडला असला तरी पोलिसांकडून अद्याप कडा शहरात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली नाही . शिवाय गावात होणारे पोलिसांचे पथसंचलन सुद्धा घेण्यात आल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे पोलिसांना शांतता कमिटीची बैठक घेण्याचा विसर पडला की काय, असा प्रश्न गणेश भक्तांकडून उपस्थित होऊ लागला. पोलिसांनी आतातरी किमान गणेशोत्सवाच्या कालावधीत सामाजिक शांतता राखण्यासाठी बोकाळलेल्या मलाईदार अवैध धंद्यांना पायबंध घालून मोठ्या साहेबांच्या माणसाळलेल्या 'लक्ष्मीभक्तांचा' बंदोबस्त करावा. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
-------%%-------

stay connected