कृत्रिम पाणवठे भागवणार
आता वन्यजिवांची तहान
-----------------------
उन्हाळ्याची चाहुल लागताच, वनविभागाकडून पाण्याचे नियोजन
---------------------
राजेंद्र जैन /कडा
------------------
फेब्रुवारी महिन्यातच वाढलेला उष्मा पाहता, पुढील मार्च, एप्रिल या महिन्यात वन्य पशुपक्षांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, म्हणून वनविभागाने उन्हाळ्याच्या पुर्वसंध्येलाच वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठ्यात टँकरच्या माध्यमातून पाणी भरण्याचे नियोजन केल्यामुळे आता वन्यप्राण्यांच्या पाण्यासाठी उन्हातान्हात होणा-या भटकंतीला ब्रेक लागणार आहे.
आष्टी वनविभागाच्या वनक्षेत्र परिसरात बशीच्या आकाराचे जवळपास सतरा कृत्रिम पाणवठे आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. त्यामुळे आगामी तीन-चार महिन्यात वन्यजिवांची उन्हातान्हात पाण्यासाठी भटकंती होऊ नये. याकरिता उन्हाळ्याच्या पुर्वसंध्येला वनविभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. वनक्षेत्र परिसरातील हरीण, काळविट, कोल्हा, तरस, ससा, उदमांजर, लांडगा, मोर, लांडोर, सायाळ, मुंगूस, रानडुक्कर, व पशुपक्षी इत्यादी वन्यजिवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता असते. यामुळे वन विभागाकडून वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठ्यात टँकरच्या माध्यमातून पाणी टाकण्यात येत असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी एल.व्ही. तागड यांनी सांगितले. विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दत्तात्रेय जायभाय, वनरक्षक कल्पना विधाते, अशोक काळे, किरण पंडलवाड, बाबासाहेब शिंदे, बळीराम यादव, जयदत्त आरगडे यांच्यासह वन कर्मचा-यांकडून वन्यजिवांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही. म्हणून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
---------%%-------
उन्हाळ्याच्या पुर्वसंध्येलाच वाढता उष्मा पाहता आगामी काळात वन्यजिवांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत, म्हणून वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यात पाणी भरण्याचे केलेले नियोजन हे आशादायक आहे.
-नितीन आळकुटे, प्राणीमित्र कडा
----------%%--------


stay connected