हे पितृपक्षा
हे पितृपक्षा तु का येतोस
भेटायला पृथ्वीवासीयांना
काहीही न सांगता
अरे तु येतोस म्हणून ही लेकरं
मायबापाची,जीवंतपणी
सेवा करीत नाहीत
तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात
अन् देतात नाना त-हेचे चटके
कारण मेल्यावर प्रायश्चीताची सोय आहे
खरंच ते तृप्त होत असतील का रे
हे पितृपक्षा खरंच कावळा
पिंडाला शिवल्यावर पुण्य लाभते का रे
की मायबापाची सेवा केल्यावर पुण्य लाभते
तरीही विचार मोडणारे दिसतात मला
अन् दिसतात मला कधी
एक ग्लास जीवंतपणी पाणी न देणारे
मेल्यावर तिरडीला खांदा,
शवाला अग्नी,धावून धावून गोव-या जमा करतांना केलेली धावपळ,अन् ते त्यांचे धाय मोकळून रडणे
तसंच प्रेतात्मा नाराज होवू नये म्हणून बनवलेलं पंच पक्वान
खरंच यानं पाप धुतलं जातं का रे
खरंच ते तृप्त होत असतील का रे
हे पितृपक्षा,तुही पाहतोस
जे जीवंतपणी सेवा करतात
त्यांच्या नशिबात दुःखच दिसतं.
संडास मलमुत्र सारं धुवून
हाती करवंटाच
वरुन म्हाता-यांची वटवट
अन् मेल्यावर ते आत्मेही
पितृपक्ष रुपाने सतावतात
कावळा नाही शिवला तर दुःख,मेल्यावरही
मेल्यावर शेतीची वाटणी
रितसर सारख्या प्रमाणात
मंजूरी दिली नसल्यानं भांडणं,खुन
ते आत्मे वरुन पाहात असतील सारा पोरखेळ
खरंच ते तृप्त होत असतील का रे
हे पितृपक्षा,तु शहाणा असशिल पण
कळत नाही मला तुझे हे वागणे
कावळा रुपानं त्यांचे पिंडाला शिवणे
दररोज होळ्या होळ्या म्हणून त्यालाच मारणे
त्यांची पैशासाठी तस्करी करणे
जीवंतपणी त्यांचेशी माणसाचे बेताल वागणे
मेल्यावर पात्रावर दारु,मटन,बिडीबंडल सर्वकाही
खरंच ते आत्मे तृप्त होत असतील का रे
हे पितृपक्षा,तरीही तु येतोस
त्यांच्या दारात उभा राहतोस
निर्लज्जासारखा,ताटकळत
मग बनवणार नाही तर काय पंच पक्वान
कदाचित थोडं पुण्य मिळेल हा विचार करुन
अन् कावळा पिंडाला शिवायची वाट पाहतात
कावळा पिंडाला शिवतोही
कारण कावळाच तो
त्याला भूक अपार लागलेली असते
हे पितृपक्षा,पापपुण्य काही नसतं
मायबाप लेकरांना जन्म देतात
त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य
तु आला नाही तरीही......
पण तु येत असल्यानं
सारंच पाप
लोकं कर्तव्य विसरलेय
मेल्यावर श्राद्ध करु म्हणतात
पापातून मुक्ती करु म्हणतात
मग ढोंग्याच्या हातानं
पितृपक्ष शांतीकार्य,शांतीमंत्र,होमहवन, श्राद्ध कार्य
सारंच काही अविरतपणे
खरंच ते तृप्त होत असतील का रे
हे पितृपक्षा,तेच मला कळत नाही
पण तुला तरी समजते का रे
हे तरी एकदा येवून सांग
अन् सांग की जीवंतपणी
सेवा करायची गरज नाही
मरु दे त्या मायबापांना तडफडत
मी आहे ना पुण्य मिळवून द्यायला
तु घाबरु नकोस कधीही
ते मेल्यावर श्राद्धकार्य
करुन
तुमचं सारं पाप धुवून काढील
तुमची पापातून मुक्ती करील
पण दरवर्षी येईल तुमच्यासाठी
केलेल्या पापाचं प्रायश्चित व्हावं म्हणून
तुमचे सारे पाप धुतले जावे म्हणून
stay connected