अमोलक जैनच्या प्रांगणात विठू माऊलींचे रिंगण उत्साहात

 अमोलक जैनच्या प्रांगणात विठू माऊलींचे रिंगण उत्साहात   आषाढी एकादशीनिमित्त बालगोपाळांचा रिंगण सोहळा




  

------------------

राजेंद्र जैन / कडा                                                                

-------------------

याची देह , याची डोळा,

आज पाहिला रिंगण सोहळा !!

होता टाळ-मृदंगाचा ध्वणी,

हरिनामाच्या जयघोषाने

गेले रिंगण रंगुनी !!


ज्ञानोबा..माऊली..तुकाराम...

असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज... टाळ- मृदंगाचा गजर... डौलाने फडकणा-या भगव्या पताका अन् देहभान विसरुन नाचणारे बालगोपाळ अशा चैतण्यदायी वातावरणात अमोलक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विठू माऊलींचा जयघोष करीत जैन साध्वी मधूर व्याख्यानी विश्वदर्शनाजींसह कीर्ती सुधाजी मसा यांच्या उपस्थितीत दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात मंगळवारी सकाळी पार पडला.  

Vdo पहा,👇



आषाढी एकादशीनिमित्त कडा येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात मंगळवारी सकाळी बालगोपाळांचा दिंडी सोहळा संपन्न झाला. विठ्ठल- रुक्मिणीसह डोक्यावर तुळशी वृंदावण, भगव्या पताका अन् हातात टाळ अशी वारकऱ्यांची वेषभुषा साकारुन विठ्ठल नामाचा जयघोष करीत विठ्ठल नामाची शाळा भरली. तहान, भूक विसरुन राज्यातून लाखो वारकरी पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना होतात. आषाढी एकादशी आणि विठु माऊलीचे विशेष महत्त्व शाळेतील लहानलहान विद्यार्थ्यांना समजावे, हाच अध्यात्मिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या शिक्षक, विद्यार्थ्यांकडून आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वृक्षदिंडी, रिंगण सोहळा, फुगडी असे विवध उपक्रम घेण्यात आले. शाळेच्या लहानग्या बालगोपांनी विठुनामाचा जयघोष करत दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या बाल दिंडी सोहळ्या यशस्वीतेसाठी अमोलक संस्थेच्या विविध विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी जैन साध्वी विश्वदर्शनाजी मसा यांनी चिमुकल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत शुभाशिर्वाद दिले. याप्रसंगी अमोलक जैन शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.     

                                                                                -----%%-------                                           चातुर्मासनिमित्त प्रवेश                                             ------------------                                                                                              

प्रख्यात जैन साध्वी मधूर व्याख्यानी विश्वदर्शनाजी व किर्ती सुधाजी मसा यांचा चातुर्मास सोहळ्यानिमित्त कड्यात बुधवार दि.१७ जुलै रोजी सकाळी आठ वाजत येथील जैन स्थानकात प्रवेश होणार असून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रतिलाल कटारिया, संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा यांनी केले आहे.                        -------%%---------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.