खडकत येथुन आठ टन गोवंशीय मांस बाहेरगावी जाताना जप्त पोलीसांची कडक कारवाई
--------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यात खडकत शिवारात कत्तलखाने उद्ध्वस्त करून महिना उलटत नाही,तोच गोवंशीय जनावरांची कत्तल सुरूच असल्याचे पुढे आले आहे.खडकत येथे कत्तल करून सुमारे आठ टन गोमांस शेजारील मिरजगाव (ता. कर्जत) परिसरातील निंबोडी शिवारात मोठ्या
वाहनात पॅकिंग करून बाहेरगावी पाठविले जात असताना मिरजगाव
पोलिसांनी हे मांस जप्त केले आहे.या प्रकरणी ९ जणांवर मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिरजगावचे पोलिस हवालदार राजेंद्र गाडे यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून इम्रान शेख (वय ३२ बीड), जगीर पठाण (वय ५४), मुसवीर कुरेशी (३१),अल्केश कुरेशी (१९, सर्व रा.
खडकत, ता.आष्टी), वाहनचालक योगेश परदेशी (४५ रा. खडकपुरा गावी,ता. करमाळा) यांच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल झाला.या कारवाईत पोलिसांनी लहान-मोठ्या ४६ गोवंशीय जनावरांची
सुटका केली.निंबोडी शिवार (ता.कर्जत) येथे गोवंशीय जनावरांची
कत्तल करून मांस वाहनात भरत असुन काही जनावरे कत्तलीसाठी आणली आहेत.याची माहिती
पोलिसांनी मिळाली होती.यावरून पोलिसांनी याठिकाणी छापा मारला
असता,आयशर टेंपोमध्ये (एमएम०४ एफयू ६२२०) गोमांस मिळून आले. यावेळी दोन जण वाहन सोडून पळून गेले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.हे खडकत येथे जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस छोट्या
वाहनाने येथे आणून मोठ्या टेंपोत भरून ते बाहेरगावी नेत असल्याचे
संशयितांनी सांगितले.
पोलिसांनी या कारवाईत आठ टन गोमांस,दोन टेंपो,पाच दुचाकी व एका कारसह ४५ गोवंशीय जनावरे असा २१ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.एका टेंपोत ३८ लहान वासरे मिळून आली.या ठिकाणापासून काही अंतरावर झाडांमध्ये गोवंश जातीच्या व कत्तलीसाठी आणलेल्या आठ जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
stay connected