आष्टी मतदारसंघातील सा.बां.च्या २३ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचे लोकआयुक्तांकडे साकडे

 आष्टी मतदारसंघातील सा.बां.च्या २३ कोटींच्या 
घोटाळ्याच्या चौकशीचे लोकआयुक्तांकडे साकडे
------------------
मनसेचे कैलास दरेकर : कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंतांनी केली चालढकल

------------------



आष्टी, दि. १७ (प्रतिनिधी) – आष्टी मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनमार्फत रस्त्यांच्या कामात करण्यात आलेल्या सुमारे २३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी गेल्या १८ महिन्यांपासून कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता चालढकल करून दोषींवर कारवाई करण्यात आखडता हात घेत आहेत. चौकशीला घाबरून अनेकांनी त्यांच्याकडील पदभार सोडले आहेत तर काहींनी आपल्या बदल्या करून घेतल्या आहेत. या घोटाळ्याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणीसाठी मनसेचे कैलास दरेकर यांनी आता थेट लोकआयुक्तांना साकडे घातले आहे. घोटाळ्याच्या सत्यतेसाठी तक्रारी निवेदनाचे नोटराईझ्ड शपथपत्र त्यांनी लोकआयुक्तांकडे सादर केले आहे. त्यामुळे हा आष्टी मतदारसंघातील सर्वात मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर (कासार), पाटोदा व आष्टी तालुक्यात आर्थिक वर्ष 21-22, 22-23 व 23-24 मध्ये प्रत्येक काम 10 लक्ष रुपये अशी 100 कामे मंजूर करून काम न करताच रु. 10 कोटी रुपयांची बोगस देयके उचलून सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. या संदर्भात मा. मंत्री (बांधकाम), सचिव (बांधकामे), मुख्य अभियंता दक्षता व गुणनियंत्रण मंडळ यांना सन 2022 पासून सातत्याने निवेदने, तक्रारी देवून व वृत्तपत्रामध्ये या प्रकरणा बाबत अनेक वेळा प्रसिद्धी होऊनही त्याची दखल घेतली नाही व चौकशी केली जात नाही, चौकशी दाबली जात आहे. 

डोंगरकिन्ही-पिंपळवंडी-अंमळनेर-प्रारामा-16 कि.मी. 73 ते 85 ची सुधारणा करणे कामाची किंमत रु. 596 लक्ष या कामाचे निविदेमध्ये हे काम चार थरांत करावयाचे होते. अ) रस्त्यावरील खड्डे भरणे, ब) 50 मी.मी. जाडीचा बीएमचा थर डांबरी भरून खडीने करणे, क) 20 मी.मी. जाडीचे डांबरी मिश्रीत खडीने कार्पेट करणे, ड) कार्पेटवर सिलकोटचा थर देणे, इ) बाजूपट्ट्या मुरूमाने भरणे व गटारची  कामे करणे, खोदई व काही ठिकाणी काँक्रीट करणे. या कामाची एकूण किंमत  रु. 596 लक्ष आहे. काम करताना फक्त 20 मी.मी. जाडीचे डांबरमिश्रीत खडीने कार्पेट केलेले आहे. उर्वरित थराचे काम न करताच काम केल्याचे दाखवून रु. 442 लक्ष रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. 

कुसळंब ते वांजरा फाटा या सुमारे 3 कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम निकृष्टपणे केल्यामुळे अवघ्या महिनाभरात हा रस्ता उखडून जावून दोन वेळा दुरुस्ती करावी लागली. या कामात अधिकारी व कंत्राटदाराने संगनमताने शासकीय निधीचा अपहार केला आहे. आष्टी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम (रु. 3 कोटी रुपये) गेल्या सहा वर्षांपासून रखडले असून या कामात निकृष्ट काम करून अनियमितता व भ्रष्टाचार करण्यात आला आहे. आष्टी ते डोईठाण रस्त्यावरील अंदाजे 1 कोटी रुपये खर्चून करण्यात येणार्‍या पुलाच्या कामात डस्टचा वापर करून काम निकृष्टपणे पूर्ण करण्यात आले आहे. कामात मोठी अनियमितता झालेली आहे.

या सर्व कामांतील गैरप्रकार व घोटाळ्याची चौकशी तक्रारदार, दोन तज्ञ व स्थानिक लोकांच्यासमोर करावी व दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी कैलास दरेकर यांनी लोकआयुक्तांकडे केली आहे. 








काहींनी सोडला पदभार

काहींनी करून घेतल्या बदल्या

या सर्व कामांतील सुमारे २३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात मनसेचे कैलास दरेकर यांनी कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, शासन, मंत्री, सचिव यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, चौकशी केली जात नाही. यामध्ये लोकप्रतिनिधी सामील असल्यामुळे चौकशी होत नाही. तसेच चौकशीच्या ससेमिरा नको म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन येथील काही अभियंता यांनी पदभार सोडले असून काहींनी आपल्या बदल्या करून घेतल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.