या जिल्ह्यात पावसाचा अंदाज : Rain updates
महाराष्ट्रात यंदा मान्सूनकाळात चांगला पाऊस झालेला नाही. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यामुळे पाणीटंचाई जाणवू लागली आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी गावांमध्ये दुष्काळ पाहायला मिळतं आहे. दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्य शासनाने महाराष्ट्रातील कमी पाऊस झालेल्या प्रदेशात दुष्काळ जाहीर केलेला आहे. आता या संबंधित भागांमधील सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दुष्काळाच्या विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत.
मात्र असे असले तरी, कमी पावसामुळे या संबंधित भागात आगामी काही दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात आता आगामी काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या दुष्काळग्रस्त गावांमधील पिण्याच्या पाण्याचे संकट काही प्रमाणात का होईना पण कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुष्काळग्रस्त गावांमध्ये जर अतिवृष्टी झाली तर तेथील नागरिकांसाठी अन गुराढोरांसाठी हा पाऊस दिलासा देणारा राहील असा अंदाज देण्यात आला आहे. हवामान विभागाने 28 नोव्हेंबर पर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.
राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून काही भागात अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे. दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान खात्याने राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे.
25 नोव्हेंबर : 25 नोव्हेंबरला मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
26 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद या जिल्ह्यात मुसळधार पावसाची आणि काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधीत जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि विदर्भ विभागातील भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
27 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नासिक, कोकणातील पालघर तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि संपूर्ण विदर्भासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
28 नोव्हेंबरला मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यात आणि विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
stay connected