तर तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, मोदी सरकारच्या काळात झालेल्या छापेमारीवर प्रकाश आंबेडकरांनी केलं भाष्य

 तर तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, मोदी सरकारच्या काळात झालेल्या छापेमारीवर प्रकाश आंबेडकरांनी केलं भाष्य



वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशातील छापेमारीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या नऊ वर्षात देशातील विविध राजकीय नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. मात्र संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल केला नाही. शिवाय संबंधित भ्रष्टाचाराचं प्रकरण न्यायालयात न नेता मध्येच लटकावून ठेवल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. ते संविधान सन्मान महासभेत बोलत होते.


देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आता हळूहळू जशी सत्ता जात आहे, तसा यांचा कार्यक्रमही बदलत आहे. सगळ्याच गोष्टींचा वापर केला जात आहे. आज सकाळपासून किती धाडी पडल्या, ते मी बघत होतो. माझ्या माहितीप्रमाणे आज देशभरात सात ठिकाणी धाडी पडल्या. मग गेल्या नऊ वर्षात किती ठिकाणी धाडी पडल्या? याचा विचार करा. ज्यांच्यावर धाडी पडल्या त्यांची चौकशी झाली पण त्यांना न्यायालयात उभं केलं नाही. त्यांना लटकावत ठेवलं आहे. हे लटकावत ठेवण्याचं जे राजकारण आहे, त्यांना देशात भीती निर्माण करण्याची आहे.”

“तुम्ही आमच्या विरोधात जाणार असाल तर आम्ही छापेमारी करू आणि तुम्हाला तुरुंगात पाठवू, अशा धमक्या देऊन येथील व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर आपण या देशाचे मालक आहोत आणि ज्याला निवडून दिलंय, तो आपला नोकर आहे. एवढं लक्षात ठेवा. पण दुर्दैवाने मालकाने आपलं मालकपण सोडलं आहे,” असं प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “उद्या आपण केंद्र सरकारला विचारलं पाहिजे, तुम्ही ज्यांच्यावर आतापर्यंत धाडी टाकल्या, त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत. त्यांना न्यायालयात उभं केलं असतं तर तो आरोपी आहे किंवा नाही? हे न्यायालयाने सांगितलं असतं. पण संबंधितांना न्यायालयात घेऊन जायचं नाही, आपल्याच टेबलवर ऑपरेशन करायला घ्यायचं आणि त्याला सांगायचं, जोपर्यंत तू माझ्याविरोधात बोलत नाहीस, तो पर्यंत तू जिवंत आहेस. ज्यादिवशी तू माझ्याविरोधात बोलशील, त्यादिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असं राजकारण संविधानाला धरून नाही.”





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.