पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा; अजितदादांचं आवाहन....

 पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, 

आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा; 

अजितदादांचं आवाहन....



प्रतिनिधी : संजय पंडित


दि.२ मुंबई: आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं होतं. आता काही पोलिसांची पोटं सुटली आहेत. ते गुन्हेगारांचा पाठलाग कसा करतील असा प्रश्न समोर येतो. मुख्यमंत्री साहेब बघा कसे सडपातळ आहेत. आम्हाला पोलिसांची सुटलेली पोटं कमी करायची आहेत. मी लहानपणापासून पोलिसांना बघत आलोय. पोलिसांचा धाक आणि दरारा वाटला पाहिजे. पोलीस पहिलवान नको, पण पोलीसच वाटला पाहिजे. पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा. आर्मीतील जवानांसारखा फिटनेस ठेवा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. पोलिसांच्या ११२ हेल्पलाईन आणि सीसीपीडब्ल्यूसी प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते. कसाबने केलेला हल्ला अजूनही आपण विसरु शकत नाही. ते तयारीने घुसले होते. त्यावेळी तुकाराम ओंबळे यांनी त्याला कसाबसा पकडून ठेवले होते. त्यात त्यांना प्राण गमवावा लागला होता. साडेतीन हजार वाहन आपण उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती अजितदादांनी दिली.

महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच पोलिसांना विश्वास दिला आहे. कोविड काळात सक्षमपणे पोलीसांनी काम केलं आहे. डायल ११२ साठी वाहन कमी पडतात यासाठी जिल्हा नियोजनमधील निधी दिला जाईल. पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे तो मार्गी लावायचा आहे. मागील सरकारच्या काळात हा निर्णय घेतला होता. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी एवढा वेळ का लागतो याची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मात्र तुमच्या विश्वासााला डाग लागता कामा नये, असं अजित पवार म्हणाले.

हिंदी चित्रपट दाखवले जात होते तस काही पोलिस अधिकारी वागतात. तसं होता कामा नये. पारदर्शक कारभार असला पाहिजे. दोन नंबरचे धंदे बंद झाले तर कर वाढू शकतो. त्यातून वाढलेला निधी गृह खात्याला देता येईल. एक्साईज आणि पोलीस विभाग एकत्र बसून यावर विचार करू. गृहमंत्री यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. जर एखादी व्यक्ती चुकीची वाटत असेल तर ती ओळखा आणि आपल्या खात्याची बदनामी टाळा, असं आवाहनही त्यांनी केलं.

डायल ११२ प्रकल्पाच उद्घाटन आपण करत आहोत. ही सेवा नागरिकांना अपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मिळेल. २४ तास ही सेवा असणार आहे. १०० नंबरला फोन केला तर कुठून फोन आला हे लगेच समजत नव्हतं. मात्र ११२ मध्ये ठिकाणही समजणार आहे. व्यक्त होणं आणि शेअर करणं हे सोशल मीडियावरती अनेकदा महागात पडतं. जनतेच्या मनात पोलिसांच्या मनात विश्वास आणि दरारा निर्माण करणं महत्वाचं आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.