लोडशेडींगमुळे ठाणे जिल्ह्यात तब्बल २७ गावं अंधारात...
नागरिकांची गैरसोय चोरीच्या घटनांमध्येही वाढ...!
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.१५ ठाणे : महाराष्ट्र सरकारने राज्यातील बहुतांश भागात लोडशेडिंग सुरू केले आहे. ठाण्यातील कल्याण पूर्वेकडील मलंग गड परिसरात रात्रीच्या वेळी होणाऱ् या लोडशेडिंगचा फटका २७ गावांना बसला आहे. या अंधारामुळे परिसरातील चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे महावितरणने तात्काळ लोडशेडिंग रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बुधवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, अशात नागरिकांची गैरसोय होत असल्याने, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित करू नये, असे आवाहन केले. नगरसेवक कुणाल पाटील म्हणाले, ‘लोडशेडिंगमुळे रात्रीच्या वेळी चोरटे सक्रिय झाले आहेत. याबाबत आम्ही महावितरणच्या अभियंत्यांची भेट घेतली आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित करू नका, असे नागरिक वारंवार महावितरणच्या अधिकार्यांना आवाहन करत आहेत, परंतु अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. कल्याण पूर्व येथे आणि त्यांना प्राधान्याने या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे.’
यावेळी कल्याण पूर्व विभागातील महावितरणचे अभियंते याबाबत काही बोलण्यासाठी उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत लोडशेडिंग कमी करण्याच्या नागरिकांच्या मागणीला महावितरणचे अधिकारी कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महावितरणच्या अभियंत्यांच्या भेटीवेळी पोलीस पाटील, चेतन पाटील, प्रशांत पाटील, हेमंत चिकनकर, मयंक पाटील आणि २७ गावांतील काही ग्रामस्थही उपस्थित होते.
stay connected