*लातूर/ प्रतिनिधी चंद्रकांत पाटील
*तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या**आमदार धिरज देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; पालकमंत्री गिरीश महाजन यांची घेतली भेट*
रेणापूर, लातूर तालुक्यात गारपिटीचा तडाखा; फळपिकांचे मोठे नुकसान
---
लातूर : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे लातूर आणि रेणापूर तालुक्यातील फळ-पिकांचे व भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तत्काळ दखल घेवून 'लातूर ग्रामीण'चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे शनिवारी पत्राद्वारे केली.
राज्याच्या वेगवेगळ्या भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिट सुरू आहे. लातूर जिल्ह्यातही शुक्रवारी (ता. १७) वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, शनिवारी (ता. १८) लातूर आणि रेणापूर तालुक्यातील विविध गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी यासह इतर पिके जमीनदोस्त झाली. आंबा, द्राक्ष, टरबूज, खरबूज, चिकू, पपई अशा फळांसह भाज्यांचे नुकसान झाले.
शेतकरी बांधवांवर कोसळलेल्या या अस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. याची आमदार श्री. धिरज देशमुख यांनी त्वरित दखल घेतली. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना पत्र पाठवून लातूर आणि रेणापूर तालुक्यात झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. तसेच, त्वरित पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणीही त्यांच्याकडे केली. शेतकरी बांधवांना मदत करण्याबाबत लातूरचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन यांची जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी भेट घेवून त्यांनाही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी पत्र दिले.
stay connected