पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचीच शक्यता कायम राहणार
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदनगर पुणे धुळे नाशिक समवेतच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाची तीव्रता खूपच अधिक होती. धुळे जिल्ह्यात तर बहुतांशी भागात गारपीट झाली. त्यामुळे रब्बी हंगामातील काढण्यायोग्य पिकांचे मोठे नुकसान त्यावेळी झाले. यातून बळीराजा कसाबसा सावरत होता की पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यात पावसाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचीच शक्यता कायम राहणार आहे. दरम्यान राजधानी मुंबई मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काल झाला आहे.
आज देखील जिल्ह्यातीलं काही भागात सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. यामुळे बळीराजाच्या काळजाची धडधड वाढली आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात गारपीटीची देखील शक्यता वर्तवली आहे.
15 मार्च 2023 अर्थातच आज छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच मुंबई आणि कोकणात पावसाची शक्यता आहे.
16 मार्च 2023 रोजी अर्थातच उद्या पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे.
17 मार्च रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात पाऊस पडेल.
18 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ मध्ये पाऊस पडेल.
यासोबतच, आजपासून 16 मार्चपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता आहे. तसेच उद्यापासून 17 मार्चपर्यंत गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता राहणार आहे. निश्चितच गारपीटीची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकाची आणि पशुधनाची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे.
stay connected