महापालिका निवडणुकांसाठी 'मनसे' मैदानात; लवकरच पक्षाची रणनीती ठरणार

 महापालिका निवडणुकांसाठी 'मनसे' मैदानात; 

लवकरच पक्षाची रणनीती ठरणार



प्रतिनिधी : संजय पंडित


दि.२९ मुंबई : आगामी मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी येत्या २ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठक घेणार असून, या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. राज्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक आहे. मात्र, सध्या जगभरात फक्त ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची चर्चा होती. कोरोनाचा संसर्ग वाढला तर प्रभाग रचना अंतिम करून या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतील असा अंदाज होता. मात्र, ओमिक्रॉन विषाणूचा धोका म्हणावा तितकासा दिसत नाही. हे पाहता सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या निवडणुकीसाठी जोरदार तयार केली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या ठिकाणी पक्षाने जोर लावलेला दिसतोय. नाशिकमध्ये तर पक्षाचे प्रमुख राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे आणि इतर नेते मंडळींनी चार महिन्यांपूर्वीपासूनच जोर लावला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले. मुंबई, ठाणे, पुण्यातही मनसेने जोर लावला आहे. स्वतः राज ठाकरे यांनी औरंगाबादसह या साऱ्या शहरांचे काही दिवसांपूर्वीच दौरे केले. त्यानंतर आता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे येथील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतः राज ठाकरे चर्चा करणार आहेत. ते तेथील परिस्थितीचा त्यांच्याकडून आढावा घेणार असल्याचे समजते. शिवाय यावेळी राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना कानमंत्रही देणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सध्या आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची जोरदार चर्चा आहे. यापूर्वी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात एक बैठक झाली आहे. याबैठकीत काय झाले हे समोर आले नाही. मात्र, तेव्हापासून युतीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मनसे आणि भाजपमध्ये कसलिही युती झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर मनसेकडूनही असे वक्तव्य करण्यात आले. मात्र, आगामी काळात ही युती होणार का, यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.